नवी दिल्ली -कोरोना व्हायरसने जगभरात धूमाकुळ घातला आहे. या व्हायरसचा शिरकाव क्रीडा क्षेत्रातही झाला असून अनेक स्पर्धा स्थगित झाल्या आहेत. अनेक क्रीडापटूही आपल्या घरीच वेळ घालवत आहेत. तर, काहीजण आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे जनजागृती करत आहेत. अशातच, इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हिन पीटरसनचे कोरोना संदर्भातील एक हिंदी ट्विट व्हायरल झाले आहे.
हेही वाचा -कोरोनाला मात देण्यासाठी 'हा' क्रिकेटपटू बनवतोय 'सॅनिटायझर्स'!
भारतात कोरोनाचा धोका वाढलेला पाहून पीटरसननेही भारताला एक विशेष संदेश दिला आहे. 'नमस्ते इंडिया. कोरोना व्हायरसचा पराभव करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत. चला आपण सर्वांनी आपल्या सरकारच्या आदेशाचे पालन करू घरी राहू. ही वेळ दक्षता घेण्याची आहे. तुम्हा सर्वांना खूप प्रेम', असे पीटरसनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटवरही खूप परिणाम होत आहे. बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला १५ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. यापूर्वी ही स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती. कोरोनो व्हायरसमुळे आयपीएलचा १३ वा हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चीनच्या वुहान शहरातून जगभरात वाऱ्यासारखा पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे १० हजाराहून अधिक लोकांचा प्राण गेला आहे. जगातील १५० हून अधिक देशात या विषाणूचा फैलाव झाला असून दीड लाखांहून अधिक लोकांना यांची बाधा झाली आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने उपाययोजना करत आहे.