चेन्नई - भारतीय संघाने पहिल्या कसोटीतील पराभव विसरून. दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करत इंग्लंडचा ३१७ धावांनी पराभव केला आणि चार सामन्याच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. भारताचा हा विजय इंग्लंडच्या माजी खेळाडूंना पचलेला नाही. त्यांनी भारतीय संघाचे कौतुक करताना टोमणे मारले आहेत.
चेन्नई कसोटीच्या चौथ्याच दिवशी भारतीय संघाने इंग्लंडवर विजय मिळवला. भारताच्या विजयानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने हिंदीमध्ये ट्विट केले आहे. यातून त्याने टोमणा मारला आहे.
पीटरसनने त्याच्या ट्विटमध्ये काय म्हटलं...
इंग्लंड बी संघाला पराभूत केल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन, अशा आशयाचे ट्विट पीटरसन याने केले आहे.
इंग्लंडने त्यांच्या महत्त्वपूर्ण खेळाडूंना दुसर्या कसोटीत विश्रांती दिली म्हणूनच भारताने विजय मिळविला, असे सांगण्याचा प्रयत्न पीटरसनने केला आहे.
मायकल वॉनचा दावा...
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारतीय खेळपट्टीवर टीका करत इंग्लंडच्या फलंदाजीला घाबरून चेन्नईची खेळपट्टी फिरकीला पोषक बनवण्यात आली. तसेच भारताने नाणेफेक जिंकली म्हणूनच त्यांना सामना जिंकण्याची संधी मिळाली, असा दावा केला आहे.
भारतीय संघाने मालिकेत साधली बरोबरी...
चेपॉक मैदानावर रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर ३१७ धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशीच विराट सेनेने इंग्लंडची भंबेरी उडवत पहिल्या कसोटीतील पराभवाचा वचपा काढला. भारताच्या ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात १६४ धावांत आटोपला. पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या अक्षर पटेलने ५ बळी घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. सामन्यात अष्टपैलू कामगिरी नोंदवणाऱ्या भारताच्या रविचंद्रन अश्विनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
हेही वाचा -IND vs ENG : तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा, 'या' खेळाडूला वगळलं
हेही वाचा -IND vs ENG : तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा, 'या' खेळाडूला वगळलं