विशाखापट्टणम -भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील पहिली कसोटी रंगतदार अवस्थेत आहे. या कसोटीमध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्माने दमदार कामगिरी करत आपण कसोटीत फलंदाजी करु शकतो हे दाखवून दिले. या सामन्यात रोहितचीच चर्चा असली तरी त्याला दोन्ही डावांत बाद करणाऱ्या गोलंदाजाचीही तेवढीच चर्चा आहे. याच गोलंदाजाने कसोटीमध्ये त्रिशतक गाठले आहे.
हेही वाचा -रोहित शर्माने भरमैदानात हासडली पुजाराला शिवी, व्हिडिओ व्हायरल
या सामन्याच्या दोन्ही डावांत रोहितने दमदार शतके झळकावली. आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज याने दोन्ही डावात रोहितला बाद केले. सामन्याच्या पहिल्या डावात त्याने १८९ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. तर, दुसऱ्या डावात त्याने १२९ धावांमध्ये २ बळी घेतले. त्यामुळे त्याच्या नावावर एकूण सामन्यात तब्बल ३१८ धावा झाल्या आहेत. या आकडेवारीमुळे तो एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
या विक्रमामध्ये प्रथम क्रमांकावर विंडीजचे माजी गोलंदाज टॉमी स्कॉट आहेत. त्यांनी ९ विकेट्स घेताना ३७४ धावा दिल्या होत्या. तर, दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा जेसन क्रेजझा आहे. त्याने भारताविरुद्ध १२ विकेट्स घेताना ३५८ धावा दिल्या होत्या.
कसोटीत जास्त धावा देणारे गोलंदाज -
- टॉमी स्कॉट - ३७४ धावा (९ बळी)
- जेसन क्रेजझा - ३५८ धावा (१२ बळी)
- केशव महाराज - ३१८ धावा (५ बळी)
- आर्थर मेली - ३०८ धावा (७ बळी)