तिरुअनंतरपुरम- लॉकडाऊनच्या काळात, विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी, पोलिसांनी ड्रोनचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. नागरिक ड्रोन पाहून कारवाईच्या भितीने पळत सुटल्याचे अनेक व्हिडिओ, सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशात केरळ पोलिसांनी त्यांच्या ट्विटरवरून ड्रोनने चित्रीत केलेला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी क्रिकेटची कॉमेंट्री जोडली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. लोकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात येत आहे. पण अजुनही काही लोकांना त्याचे गांभीर्य दिसत नाही. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्यांवर आता सरकारकडून कठोर कारवाईसाठी पावलं उचलली जाणार आहेत. अशा लोकांवर ड्रोनची नजर ठेवण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे.
केरळ पोलिसांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ड्रोनला पाहून नागरिक कारवाईच्या भितीने सैरभैर धावत आहेत. आपण पोलिसांना दिसू नये यासाठी अनेक नियम मोडणारे लोक आपला चेहरा लपवून जात असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ नीट पाहा त्यामध्ये हा ड्रोन कसा काम करणार आहे, हे पोलिसांनी सांगितलं आहे.