नवी दिल्ली - क्रिकेटच्या मैदानावर अनेक रंजक किस्से घडत असतात. सामन्याव्यतिरिक्त अशा विविध घटनांमुळे चाहत्यांनाही निखळ आनंद मिळतो. सध्या असाच एक किस्सा पाकिस्तान सुपर लीगमध्ये घडला आहे. या स्पर्धेच्या एका सामन्यात चोप देणाऱ्या फलंदाजाला बाद करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाच्या यष्टीरक्षकाने चक्क त्याचे पाय धरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा -राशिदच्या 'कॅमल बॅट'चं रहस्य काय?
सध्या पाकिस्तान सुपर लीगच्या पाचवा हंगाम सुरु आहे. दरम्यान, पीएसएलमध्ये लाहोर कलंदर आणि कराची किंग्ज यांच्यात रविवारी रात्री सामना झाला. लाहोर कलंदरचा फलंदाज बेन डंकला बाद करण्याच्या प्रयत्नात कराची किंग्जचा यष्टीरक्षक चाडविक वॉल्टनने त्याचे पायच धरले. बेनने डेलपोर्टच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चेंडू बॅटला लागला आणि यष्टीरक्षक वॉल्टनने झेल घेण्यासाठी त्याचे पाय धरले. लाहोर कलंदरच्या डावाच्या १० व्या षटकात हा प्रकार घडला.
या सामन्यात लाहोरने कराचीला ८ गडी राखून पराभूत केले. कलंदरचा फलंदाज एकदा बेन डंकने वादळी खेळी केली. त्याने ४० चेंडूत ९९ धावा चोपल्या.