मुंबई- कोरोनामुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामावर अनिश्चिततेचे सावट आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे आपापल्या घरी असलेले खेळाडू एकमेकांना सोशल मीडियावर डिवचताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स संघाचे आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन, बुमराहने जर चहलला गोलंदाजी केली तर ते षटक कसे जाईल? असा प्रश्न विचारत चहलची खिल्ली उडवली होती. यावर चहलने मुंबई इंडियन्सला सडेतोड उत्तर दिले आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स संघाचे खेळाडू रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनी लाईव्ह चॅटमध्ये, रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाचा खेळाडू युजवेंद्र चहल फलंदाजीला आल्यानंतर आपण त्याला बादच करायचे नाही आणि त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण कसे असेल यावर चर्चा करत, चहलची खिल्ली उडवली होती. यानंतर मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर हँडलवरून, बुमराहने चहलला गोलंदाजी केली तर ते षटक कसे जाईल, असा प्रश्न विचारला होता.
मुंबई इंडियन्सच्या या प्रश्नावर चहलने उत्तर दिले आहे. तो म्हणाला, 'आधी अॅरोन फिंच, एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीला बाद करा आणि मग मला बॉलिंग करण्याची स्वप्न पाहा.'