पुणे -बारामतीमध्ये बीसीसीआयने राज्यस्तरीय व रणजी सामने खेळवण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच बारामतीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर क्रिकेटचे सामने रंगताना दिसणार आहेत. भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि मराठमोळ्या केदार जाधवने या मैदानावर प्रतिक्रिया दिली आहे.
बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर महाराष्ट्र 'अ' विरुध्द महाराष्ट्र 'ब' संघामध्ये झालेल्या सामन्यात केदार जाधवचा खेळ बारामतीकरांना पाहता आला. सामन्यानंतर केदार म्हणाला, 'आंबेडकर स्टेडियम मधील धावपट्टी आणि मैदान उच्च दर्जाचे असून आमच्या सारख्या खेळाडूंना नक्कीच उत्साह देणारे आहे. या मैदानावर जास्तीत जास्त सामने व्हावेत, तसेच या भागातील जास्तीत जास्त खेळाडू महाराष्ट्रासह भारतासाठी खेळावेत आणि बारामती सारख्या ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम क्रिकेट प्रेमींसाठी खुले झाल्याने या स्टेडियममधून लवकरच उदयोन्मुख क्रिकेटपटू निर्माण होतील असा, विश्वास त्याने व्यक्त केला.