मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत करा, असे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत असून अनेक लोकं मदतीसाठी पुढे येत आहेत. यात मराठमोळा क्रिकेटपटू केदार जाधवच्या नावाचीही भर पडली आहे. केदारने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरने (एमसीसीआयए) हाती घेतलेल्या संकल्पाला निधी दिला आहे. याशिवाय त्याने मुख्यमंत्री सहायता निधीसाठीही काही मदत केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी एमसीसीआयएने पुढाकार घेतला आहे. त्यात उद्योग क्षेत्राकडून निधी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निधीचा वापर आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी करण्यात येत आहे. यात केदार जाधवने आपले योगदान दिले आहे, अशी माहिती ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी दिली.
एमसीसीआयएच्या निधीतून संरक्षक पोशाख, एन ९५ मास्क, व्हेंटिलेटरचा पुरवठा, रुग्णालये आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना केला जात आहे. पहिल्या टप्प्यात व्हेंटिलेटर्स आणि मास्क विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.