शारजाह - कोलकाता नाइट राडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकने रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलिअर्सचे कौतूक केले. त्याने, डिव्हिलिअर्स हा वर्ल्ड क्लास खेळाडू असल्याचे सांगत, त्याला मैदानात रोखण कठीण असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर बंगळुरूने कोलकाता नाइट रायडर्सचा ८२ धावांनी पराभव केला. या सामन्यात डिव्हिलिअर्सने वादळी खेळी केली.
सामना संपल्यानंतर कार्तिक म्हणाला, 'डिव्हिलिअर्स वर्ल्ड क्लास खेळाडू आहे. तो दोन संघामध्ये मोठी तफावत निर्माण करणार खेळाडू आहे. त्याला रोखणे कठीण आहे. पण आम्ही त्याला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. डिव्हिलिअर्सला एकच चेंडूने रोखता येत होते. तो चेंडू म्हणजे इनस्विंग यॉर्कर. यॉर्कर शिवाय दुसरा चेंडू टाकल्यास डिव्हिलिअर्स त्या चेंडूला सीमारेषेबाहेर टोलावत होता.'
आम्हाला आमच्या रणणीतीवर आणखी काम करण्याची गरज आहे. भलेही आम्ही त्यांना १७५ धावांवर रोखू शकलो असतो पण यासोबत आम्हाला फलंदाजी चांगली करावी लागेल, असेही कार्तिक म्हणाला. दरम्यान, सोमवारी झालेल्या सामन्यात डिव्हिलिअर्सने केकेआरच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने ३३ चेंडूत ७३ धावा चोपल्या. यात ५ चौकारासह ६ उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. डिव्हिलिअर्सच्या या वादळी खेळीच्या जोरावर आरसीबीला १९४ धावा करता आल्या. प्रत्युत्तरादाखल केकेआरचा संघ ११२ धावांच करू शकला. परिणामी आरसीबीने हा सामना ८२ धावांनी जिंकला.