महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 25, 2019, 7:37 PM IST

ETV Bharat / sports

कर्नाटकने मिळवला विजय हजारे ट्रॉफीचा मान, पटकावले चौथे विजेतेपद

नाणेफेक जिंकून कर्नाटकने तमिळनाडूला फलंदाजीचे निमंत्रण दिले. तमिळनाडूने १० बळींच्या मोबदल्यात २५२ धावा रचल्या.

कर्नाटकने मिळवला विजय हजारे ट्रॉफीचा मान, पटकावले चौथे विजेतेपद

बंगळुरू -चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कर्नाटकने तमिळनाडूचा ६० धावांनी पराभव केला आणि चौथ्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली. पावसामुळे व्यत्यय आलेल्या या सामन्यात डकवर्थ लुईसच्या आधारावर कर्नाटक संघाला विजयी घोषित करण्यात आले.

हेही वाचा -जेव्हा पंतप्रधान क्रिकेटपटूंसाठी पाण्याच्या बाटल्या घेऊन मैदानात धावतात

नाणेफेक जिंकून कर्नाटकने तमिळनाडूला फलंदाजीचे निमंत्रण दिले. तमिळनाडूने १० बळींच्या मोबदल्यात २५२ धावा रचल्या. कर्नाटककडून अभिमन्यू मिथूनने हॅटट्रिक घेत तमिळनाडूच्या डावाला खिंडार पाडले. अभिनव मुकुंद वगळता तमिळनाडूची सलामीची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. अभिनव मुकुंदने संघासाठी सर्वाधिक ८५ धावा केल्या. मुकुंदने ११० चेंडूंचा सामना केला आणि नऊ चौकार ठोकले. मुकुंदचा साथीदार मुरली विजय शून्यावर माघारी परतला. तर, आफ्रिकेविरूद्ध मालिकेत दमदार प्रदर्शन केलेल्या अश्विनलाही जास्त धावा करता आल्या नाहीत. त्यानंतर आलेल्या बाबा अपराजितला सोबत घेत मिथूनने संघाचा डाव सांभाळला. अपराजितने ६६ धावा केल्या. मिथून व्यतिरिक्त कर्नाटककडून कौशिकने २ बळी घेतले.

या आव्हानाचा पाठलाग करताना कर्नाटकने २३ षटकांत १ बाद १४६ धावा केल्या. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. सामना थांबला तेव्हा कर्नाटकचा सलामीवीर लोकेश राहुलने ५२ आणि मयंक अगरवालने ६९ धावा केल्या होत्या.

विजय हजारे चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिक घेणारा अभिमन्यू पहिला गोलंदाज ठरला आहे. शिवाय कर्नाटकसाठी लिस्ट ए क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेण्याचा पहिला मानही त्याने पटकावला. रणजी करंडक आणि विजय हजारे अशा दोन्ही स्पर्धेत हॅटट्रिक अभिमन्यूनने नावावर केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details