सुरत - कर्नाटकने सांघिक कामगिरीचे जबरदस्त प्रदर्शन करत रविवारी सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या 'फाईट'मध्ये कर्नाटकने तमिळनाडूवर एका धावेने विजय मिळवून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे कर्नाटकने तमिळनाडूचाच पराभव करत विजय हजारे ट्रॉफीचेही विजेतेपद पटकावले होते.
हेही वाचा -टिम पेनच्या 'त्या' निर्णयावर पाहा काय म्हणाले शशी थरूर
या सामन्यात तमिळनाडूला विजयासाठी शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. कर्नाटककडून अष्टपैलू कृष्णप्पा गौथम गोलंदाजी करत होता. त्याच्या गोलंदाजीवर या षटकातील पहिल्या २ चेंडूवर आर. अश्विनने २ चौकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. मात्र, एका चेंडूत 3 धावांची गरज असताना तमिळनाडूच्या संघाने कच खाल्ली आणि कर्नाटकने एका धावेने विजय नोंदवला.
कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १८० धावा केल्या होत्या. कर्णधार मनिष पांडेने नाबाद ६०, देवदत्त पड्डीकलने ३२, तर रोहन कदमने ३५ धावांची खेळी केली. तमिळनाडूकडून आर अश्विन आणि मुरुगन अश्विनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
कर्नाटकच्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तमिळनाडूला २० षटकात ६ बाद १७९ धावाच करता आल्या. कर्नाटककडून रोनित मोरेने २ तर गौथम, श्रेयस गोपाळ आणि जगदिशा सुचितने प्रत्येकी १ बळी घेतला आहे.