नवी दिल्ली - मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटच्या मानगुटीवर बसलेले फिक्सिंगचे भूत काही केल्या उतरण्याचे नाव घेत नाही. फिक्सिंगचे प्रकार रोखण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना केली. तरीही फिक्सर्सकडून नवनवीन मार्गांनी मॅच 'फिक्स' करण्याचे प्रयत्न सुरूच आहे. आता स्पॉट फिक्सिंग प्रकरणात भारतीय दोन क्रिकेटपटूंना अटक करण्यात आली आहे.
कर्नाटक प्रीमीयर लीगमध्ये स्पॉट फिक्गिंस झाले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात बंगळुरू गुन्हे शाखेने ३३ वर्षीय सी गौतम आणि अबरार काझी या दोघांना अटक केली आहे. महत्वाची बाब म्हणजे दोघेही रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाचे सदस्यही राहिले आहेत. कर्नाटक प्रिमीयर लीगच्या अंतिम सामन्यात दोघांनी संथ फलंदाजी करण्यासाठी २० लाख रुपये घेतले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
केपीएल २०१९ हंगामाचा अंतिम सामना हुबळी विरुध्द बेल्लारी संघामध्ये झाला. या सामन्यात गौतम आणि काझी या दोघांनी स्पॉट फिक्सिंग केले असल्याचे समजते. दरम्यान, यापूर्वी फिक्सिंग प्रकरणात भारतीय क्रिकेटर निशांत सिंह शेखावत तसेच विश्वनाथन आणि बंगळुरू ब्लास्टर्सचे प्रशिक्षक वीनू यांनाही पोलिसांनी अटक केली होती.