बंगळुरू- कोरोना विषाणूमुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली होती. आता महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकनेही आयपीएल पुढे ढकला, अशी मागणी केली आहे. यामुळे आयपीएलला धक्का बसणार असल्याचे दिसत आहे.
आयपीएलचे सामने महाराष्ट्रात होणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे. आता कर्नाटक सरकारने आयपीएलवर बंदी घालावी किंवा स्पर्धा पुढे ढकलावी, अशी मागणी थेट केंद्र सरकारकडे केली आहे. जर या मागणीला केंद्राची मान्यता मिळाली, तर कर्नाटकमध्ये सामने होणार नाहीत.
याआधी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागपूरमध्ये बोलताना, कोरोनामुळे अनेक कार्यक्रम रद्द होताना दिसत आहेत. गर्दीच्या ठिकाणी अशा आजारांचा प्रसार होण्याची शक्यता आहे. यामुळे आयपीएल नंतर घेतली तरी चालू शकते. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यासंदर्भातील बोलणी सुरू केली आहे. याबाबतचा निर्णय लवकरच होईल, असे सांगितले आहे.