चंदीगड - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचे होम ग्राऊंड आता तात्पुरत्या कारागृहात रूपांतर करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउनचे उल्लंघन केलेल्यांना येथे ठेवण्यात येणार आहे. चंदीगड शहरातील सेक्टर १६ हे क्रिकेटपटू कपिल देव, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांचे होम ग्राऊंड आहे.
हेही वाचा -ऐतिहासिक निर्णय...टोकियो ऑलिम्पिक आता पुढच्या वर्षी
'आम्ही सेक्टर १६ मधील क्रिकेट स्टेडियम आणि मनीमाजरा येथील क्रीडा संकुलाचे तात्पुरत्या कारागृहात रूपांतर केले आहे आणि कर्फ्यूच्या आदेशांचे उल्लंघन करणार्यांना येथेच ठेवले जाईल', असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
२० हजाराहून अधिक लोकांची क्षमता असलेले हे क्रिकेट स्टेडियम १५.३२ एकरांवर पसरले आहे. कर्फ्यू नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय दंड संहिता कलम १८८ अन्वये एफआयआर दाखल केले जाईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
पंजाबमध्ये कोरोना संक्रमणाची सात प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अशा परिस्थितीत, पंजाबचे राज्यपाल आणि प्रशासक चंडीगड व्ही.पी.सिंह बडनोरे यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून खबरदारी म्हणून शहरात अनिश्चित काळासाठी कर्फ्यूचे आदेश दिले होते.