नवी दिल्ली - दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी बुधवारी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. यापूर्वी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना ही लस घेतली आहे. कपिल देव यांच्यापूर्वी, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनीही लस टोचून घेतली. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये, कपिल देव यांच्यावर नवी दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयामध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली.
वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले आंतरराष्ट्रीय शतक -
घरगुती क्रिकेटमध्ये गोलंदाजीची छाप पाडल्यानंतर कपिल देव यांनी १ ऑक्टोबर १९७८ला पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय आणि याच महिन्याच्या १६ तारखेला पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले. पदार्पणाच्या काही दिवसानंतर कपिल देव यांनी 'दादा' संघ अशी ओळख असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. पहिल्या २५ सामन्यात १०० गडी आणि १००० धावा करणारे कपिल देव पहिलेच भारतीय खेळाडू ठरले. 'हरियाणा हरिकेन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या कपिल देव यांनी आपल्या नेतृत्वात १९८३च्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताला पहिल्यांदा विजेतेपद मिळवून दिले.