नवी दिल्ली -बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आजकाल विविध विषयांमुळे चर्चेत आहे. आता तिने एक नवे ट्विट केले आहे. आयपीएलमध्ये पंजाबविरुद्धच्या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याबद्दल समालोचक सुनील गावसकर यांनी त्याची पत्नी अनुष्का संबंधी एक वक्तव्य केले होते. त्यानंतर अनुष्काने एका पोस्टद्वारे गावसकरांना सुनावले. याच विषयावर कंगनाने अनुष्काला पाठिंबा दर्शवला आहे.
यासंदर्भात कंगनाने दोन ट्विट केले. पहिल्या ट्विटमध्ये कंगना म्हणाली, ''जेव्हा मला धमकी दिली गेली आणि शिवीगाळ केली गेली, तेव्हा अनुष्का गप्प बसली पण आता तीच गोष्ट तिच्यासोबत घडत आहे. मी या गोष्टीचा निषेध करते. सुनील गावसकर यांनी तिला क्रिकेटच्या बाबींकडे खेचले पण 'सेलेक्टिव फेमिनिझम' ही चांगली गोष्ट नाही.''
दुसऱ्या ट्विटमध्ये कंगना म्हणाली, ''बर्याच चुकीच्या लोकांनी सुनील गावसकर यांचे विधान चुकीच्या पद्धतीने घेतले. पण त्यांनी टीव्हीवर महिलेबद्दल असे काही बोलू नये. अनुष्का तिच्या आगामी सिनेमात क्रिकेटरची भूमिका साकारत आहे. सोशल मीडियावर तिचे बरे व्हिडिओ आहेत, जिथे ती विराटसोबत क्रिकेट खेळत आहे.''
नेमके प्रकरण काय -
आयपीएलमध्ये पंजाब विरुद्ध बंगळुरू असा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाबने बंगळुरूसमोर प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २०६ धावा केल्या. तर, विराटच्या नेतृत्वातील बंगळुरूचा संघ १७ षटकात १०९ धावांतच गारद झाला. विराटने शतक झळकावलेल्या पंजाबचा कर्णधार केएल राहुलचे दोन झेल सोडले. तर फलंदाजीतही विराट एका धावेवर माघारी परतला. या कामगिरीवरून सुनील गावसकर यांनी समालोचन करताना अनुष्काशी संबंध जोडून विराटच्या कामगिरीबाबत वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर ते ट्रोलही झाले. अनुष्कानेही आपली प्रतिक्रिया दिली होती. अनुष्काच्या प्रतिक्रियेनंतर गावसकरांनी आपली बाजू मांडली आहे. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला, असे गावसकरांनी सांगितले.