नवी दिल्ली -वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात २५१ धावांची मॅराथॉन खेळी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने आयसीसीने जाहीर केलेल्या फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले आहे. त्याने दोन स्थानांची झेप घेत ही कामगिरी केली. आता तो टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह संयुक्तपणे दुसर्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा -स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, 'या' संघाकडून खेळणार क्रिकेट
विल्यम्सनने नुकत्याच केलेल्या कामगिरीच्या आधारे ७४ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे त्याच्या खात्यात ८८६ गुण जमा झाले आहेत. त्याचा सहकारी खेळाडू टॉम लॅथननेही कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट रेटिंग (७३३) मिळवत दहाव्या स्थानी झेप घेतली आहे.
फलंदाजांमध्ये स्टीव्ह स्मिथ अव्वल -
आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ ९११ गुणांसह फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. वेस्ट इंडिजमध्ये शतक झळकावणार्या जर्मेन ब्लॅकवुडने १७ स्थानांची झेप घेत ४१वे स्थान मिळवले आहे. वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात ८६ धावा करणारा अल्झारी जोसेफने २१९ रेटिंगसह १२३वे स्थान मिळवले आहे.
दुसरीकडे वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावरुन खाली आला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स हा पहिल्या स्थानी आहे. गोलंदाजांच्या यादीमध्ये होल्डरचे नुकसान झाले आहे. त्याला आता सातवे स्थान मिळवले आहे.
गोलंदाजांमध्ये नील वॅग्नर दुसर्या स्थानी -
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात सहा विकेट्स घेणारा नील वॅग्नर दुसर्या स्थानावर आला आहे. स्टुअर्ट ब्रॉड ८४५ गुणांसह तिसर्या स्थानावर आहे. तर, पहिल्या कसोटीतील विजयासह न्यूझीलंडचा संघ ११५ गुणांच्या रेटिंगसह संघांच्या यादीत दुसर्या स्थानावर पोहोचला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया ११६ गुणांच्या रेटिंगसह अव्वल स्थानावर आहे. मागील वर्षापर्यंत कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या टीम इंडिया तिसर्या क्रमांकावर पोहोचली आहे.