हॅमिल्टन- टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच अस घडलं की, १०६ धावा करुनही त्या फलंदाजाच्या नावावर शतक लागलं नाही. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात हा प्रकार पाहायला मिळाला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सने या संपूर्ण सामन्यात १०६ धावा केल्या. पण त्याला टी -२० कारकिर्दीतील आपले पहिले शतक आपल्या नावावर झळकावता आले नाही.
घडलं असं की, भारताने दिलेल्या १८० धावांचा पाठलाग करताना, केन विल्यम्सनने ९५ धावांची खेळी केली. त्याला शेवटच्या षटकात मोहम्मद शमीने माघारी धाडलं. हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. तेव्हा सुपर ओव्हरमध्ये विल्यम्सनने चार चेंडूत ११ धावा केल्या. म्हणजेच या सामन्यात त्याने दोनदा फलंदाजी करताना ५२ चेंडूत १०६ धावा केल्या होत्या. पण आयसीसीच्या नियमानुसार हे शतक ग्राह्य धरले जात नाही. कारण एका खेळीत केवळ एकवेळच्याच धावा ग्राह्य धरल्या जातात. त्यामुळे १०६ धावा एका सामन्यात करूनही तो शतकापासून वंचित राहिला.
दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसरा सामना रंगतदार ठरला. मुख्य सामना 'टॉय' ठरल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये १७ धावा करत भारतासमोर विजयासाठी १८ धावांचे लक्ष्य ठेवले. तेव्हा भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल या जोडीने ऐतिहासिक विजयाची नोंद केली.