नवी दिल्ली -भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचे कौतुक केले आहे. आम्हा दोघांमध्ये बरेच साम्य असल्याचे विराटने म्हटले आहे. भारतीय क्रिकेट संघाने रविवारी 'बे ओव्हल' मैदानावर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्यात यजमान न्यूझीलंडला सात धावांनी पराभूत करून पाच सामन्यांच्या मालिकेत ५-० असा विजय मिळवला.
हेही वाचा -'टी-२०' क्रिकेटमध्ये बुमराहने नोंदवला मोठा विक्रम!
पाचव्या आणि अंतिम 'टी-२०' सामन्यात कर्णधार कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. त्याचवेळी न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसन देखील दुखापतीमुळे संघाबाहेर होता. सामन्यादरम्यान हे दोन्ही कर्णधार संवाद साधताना दिसले होते. या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
सामन्यानंतर कोहलीला विल्यम्सनशी झालेल्या संभाषणाबद्दल विचारले असता तो म्हणाला, 'विल्यमसन आणि माझी मानसिकता समान आहे, आणि आमचे विचारही एकसारखे आहेत. मला वाटते न्यूझीलंड क्रिकेट चांगल्या हातात आहे.' 'संघाचे नेतृत्व करणारा तो परिपूर्ण माणूस आहे. भविष्यातील सामन्यांसाठी आणि 'वनडे' मालिकेसाठी मी त्याला शुभेच्छा देऊ इच्छितो. न्यूझीलंडचा संघ जगातील एक असा संघ आहे, ज्याला दुसऱ्या संघाचा खेळ पाहणे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणेही आवडते', असेही विराटने म्हटले आहे.