दुबई- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने २०२० या सालच्या आयसीसी 'हॉल ऑफ फेम'ची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस, पाकिस्तानचा माजी फलंदाज जहीर अब्बास आणि पुणे येथे जन्मलेली ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची कर्णधार लिसा स्टालेकर या तिघांना आयसीसीने हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केले आहे. आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही नावे जाहीर केली.
आयसीसी हॉल ऑफ फेम २०२० ची घोषणा अॅलन विल्किन्स, सुनील गावस्कर आणि मेल जोन्स यांनी केली. आयसीसी हॉल ऑफ फेम पुरस्काराची सुरूवात होऊन अद्याप फारसा कालावधी झालेला नाही, परंतु आयसीसीकडून ९० खेळाडूंना हा सन्मान देण्यात आला आहे. मागील वर्षी भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरलासुद्धा आयसीसी हॉल ऑफ फेमसाठी निवडले गेले होते.
क्रिकेट इतिहासातील नामवंत अष्टपैलू खेळाडू अशी ओळख असलेल्या जॅक कॅलिसने १९९५ ते २०१४ यामध्ये एकाहून एक चांगल्या खेळ्या केल्या. त्याने १६६ कसोटी, ३२८ एकदिवसीय आणि २५ आंतरराष्ट्रीय सामन्यात आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व केले. यात कसोटीत १३ हजार २८९ तर एकदिवसीयमध्ये ११ हजार ५७९ धावा केल्या. याशिवाय गोलंदाजीत त्याने कसोटीत २९२ तर एकदिवसीयमध्ये २७३ गडी टिपले.
जहीर अब्बासने पाकिस्तानकडून खेळताना ७८ कसोटीत ५ हजार ६२ धावा केल्या. तर ६२ एकदिवसीयमध्ये २ हजार ५७२ धावा जोडल्या. दरम्यान अब्बास प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०० हून अधिक शतक झळकवणारे एकमेव अशियाई खेळाडू आहे. याशिवाय सलग ५ आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारे अब्बास जगातील एकमेव खेळाडू आहे.
लिसा स्टालेकर बद्दल सांगायचे झाल्यास त्यांचा जन्म पुण्यात झाला. लिसा या ऑस्ट्रेलियाकडून खेळल्या. लिसा ४ वेळा विश्वकरंडक (दोन टी-२० आणि दोन एकदिवसीय) विजेत्या आहेत, तसेच त्या जगातील पहिल्या महिला क्रिकेटपटू आहेत ज्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये १ हजार धावा आणि १०० बळी घेतले आहेत.