कराची -दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कगिसो रबाडाने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मोठा विक्रम रचला आहे. आफ्रिकेकडून २०० कसोटी बळी घेणारा रबाडा आठवा गोलंदाज ठरला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या हसन अलीला तंबूत पाठवत रबाडाने ही विक्रमी कामगिरी नोंदवली.
हेही वाचा - दुसऱ्या अँजिओप्लास्टीला सामोरा गेला बीसीसीआयचा 'बॉस'
२५ वर्षीय रबाडाने २०० कसोटी बळी घेण्यासाठी फक्त ४४ सामने खेळले आहेत. अशी कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने सर्वाधिक बळी टिपले आहेत. स्टेनने ९३ सामन्यांत ४३९ फलंदाजांना बाद केले. त्याच्यापाठोपाठ शॉन पोलॉक (४२१), मखाया एन्टिनी (३९०), अॅलन डोनाल्ड (३३०), मॉर्ने मॉर्केल (३०९), जॅक कॅलिस (२९१), व्हर्नान फिलँडर (२२४) आणि रबाडा (२००) या गोलंदाजांचा समावेश आहे.
रबाडाकडे ११७ एकदिवसीय आणि ३१ टी-२० बळी आहेत. त्यासाठी त्याने अनुक्रमे ७५ आणि २६ सामने खेळले आहेत. श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आहे. मुरलीधरनच्या नावावर ८०० बळी असून शेन वॉर्न (७०८), अनिल कुंबळे (६१९), जेम्स अँडरसन (६०६) आणि ग्लेन मॅक्ग्रा (५६३) या गोलंदाजांचा समावेश आहे.