अहमदाबाद - सलग तिसऱ्या टी-२० सामन्यात के एल राहुल धावा जमवण्यात अपयशी ठरला. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात मार्क वूडने राहुलला भोपळाही फोडू दिला नाही. त्याने तिसऱ्या षटकात राहुलला क्लीन बोल्ड केलं. यासह राहुलच्या नावे एक नकोशा विक्रम केला आहे.
राहुल इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत सातत्याने अपयशी ठरत आहे. पहिल्या सामन्यात त्याला फक्त १ धाव करता आली. तर दुसऱ्या आणि आजच्या तिसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. यासह राहुलने एका मालिकेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याबाबत अंबाती रायुडू आणि आशिष नेहराशी बरोबरी केली आहे.
नेहरा २०१० मध्ये विश्व करंडक स्पर्धेत सलग सामन्यात शून्यावर बाद झाला होता. तर अंबाती रायुडू २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅक टु बॅक भोपळा फोडण्यात अपयशी ठरला होता.