सिडनी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला १४ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेआधी ऑस्ट्रेलिया संघाला एक धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी भारत दौऱ्यातून माघार घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाने जस्टीन लँगर यांच्या मार्गदर्शनात नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. त्यापूर्वी त्यांनी घरच्याच मैदानावर पाकिस्तानला २-० धुळ चारली. घरच्या मैदानात वर्चस्व गाजवल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. मात्र, या दौऱ्यातून ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी विश्रांती घेतली आहे.
लँगर यांच्या अनुपस्थितीत संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी आता वरिष्ठ साहाय्यक अँण्ड्रयू मॅकडोनाल्ड यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, मॅकडोनाल्ड प्रथमच राष्ट्रीय संघाला मुख्य प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह.