मुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडची अवस्था ३ बाद १९ अशी झाली होती. तेव्हा डेव्हन कॉनवे न्यूझीलंडसाठी संकटमोचक ठरला. त्याने नाबाद ९९ धावा करत ऑस्ट्रेलियासमोर १८५ धावांचे आव्हान उभे केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकवण्यास त्याला फक्त एक धाव कमी पडली. दरम्यान, कॉनवेच्या या खेळीनंतर भारताचा फिरकीपटू गोलंदाज रविचंद्रन अश्विनने एक ट्विट केले आहे.
अश्विनने 'डेव्हन कॉनवे तुला फक्त चार दिवस उशीर झाला.' असे ट्विट करत त्याची फिरकी घेतली आहे. चार दिवसांपूर्वी भारतामध्ये आयपीएलसाठी खेळाडूंचा मिनी लिलाव चेन्नईत झाला. या लिलावात कॉनवेने नोंदणी केली होती. ५० लाख बेस प्राइज असलेल्या कॉनवेवर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. पण त्याने लिलावानंतर स्फोटक खेळी करत सर्वांचे लक्ष वेधलं आहे. लिलावापूर्वी कॉनवेनं ही खेळी केली असती, तर त्याला चांगला भाव मिळाला असता असा अश्विनच्या ट्विटचा संदर्भ आहे.