मुंबई- कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे सर्व खेळाडू जवळपास घरीच थांबले आहेत. ते आपल्या कुटूंबियासोबत वेळ घालवत आहेत. अशात इंग्लंड क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलरही घरीच आहे. पण त्याला घरी राहणं महागात पडल्याचे दिसत आहे. कारण तिची पत्नी लुसी त्याला 'फिट' राहण्यासाठी व्यायामाचे प्रकार शिकवत आहे.
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील २ सामन्याची कसोटी मालिका कोरोनाच्या धोक्यामुळे रद्द करण्यात आली. यानंतर इंग्लंडचा संघ मायदेशी परतला. सद्या इंग्लंडचे खेळाडू घरीच आराम करत आहेत. पण बटलरची पत्नी लुसी, बटलरचा व्यायामाचा क्लास घेताना दिसत आहे. बटलरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन व्हिडिओ शेअर केले आहे. यात पत्नी बटलरला व्यायामाचे धडे देताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, बटलर फलंदाजी किटसह व्यायाम करताना दिसत आहे. लुसी बटलरला व्यायामाचे पाच प्रकार शिकवत आहे.