लंडन - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची सध्या स्वप्नवत वाटचाल सुरु आहे. फार कमी वेळात त्याने संघासाठी दिमाखदार कामगिरी करून दाखवली. नुकत्याच झालेल्या अॅशेस मालिकेतही त्याने जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याच्या याच कामगिरीसाठी इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) त्याला खास भेट दिली आहे.
हेही वाचा -आफ्रिकेच्या कसोटी कर्णधाराने अनुभवला 'अत्यंत संतापजनक' विमानप्रवास
ईसीबीने आर्चरला कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये केंद्रीय अनुबंध गटात सामिल केले आहे. त्यामुळे त्याचे मानधन टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीपेक्षा जास्त झाले आहे. या गटात प्रत्येक खेळाडूला ९ कोटी इतके मानधन मिळते. कसोटी आणि टी-२० क्रिकेट खेळणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंना या यादीत सामिल करण्यात आले आहे. त्यामध्ये जोफ्रा आर्चरसह, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, जो रूट, बेन स्टोक्स आणि क्रिस वोक्स यांचाही समावेश आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहलीला ७ कोटी मानधन दिले जाते. बीसीसीआयने काही क्रिकेटपटूंना 'अ' प्लस आणि 'अ' अशा दोन गटांमध्ये सामिल केले होते. यात विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा या तीन खेळाडूंना 'अ' प्लसमध्ये स्थान मिळाले होते.
यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत जोफ्रा आर्चरने धमाकेदार कामगिरी केली होती. त्याच्यामुळे इंग्लंडला अंतिम सामन्यात थरारक पद्धतीने विजय साध्य करता आला होता.