गाले -इंग्लंडचा कर्णधार जो रूट कसोटी इंग्लंडसाठी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या विक्रमात रूटने केव्हिन पीटरसन आणि डेव्हिड गॉवरला मागे टाकले आहे. गाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत रूटने हा कारनामा केला. इंग्लंडच्या पहिल्या डावात रूटने १८६ धावा फटकावल्या. या खेळीदरम्यान त्याने १८ चौकार ठोकले.
हेही वाचा - ..म्हणून कुलदीपच्या जागी सुंदरला निवडलं, अजिंक्यने सांगितलं कारण
रूटने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये १८० डावांमध्ये ८२३८ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत माजी कर्णधार अॅलिस्टर कुक अव्वल स्थानावर आहे. कूकने १६१ कसोटीत १२,४७२ धावा केल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ ८९००धावा असलेल्या ग्रॅहम गूच यांचा समावेश आहे. एलेक स्टीवर्ट ८४६३ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजांच्या यादीत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने २०० कसोटी सामन्यांमध्ये १५९२१ धावा केल्या आहेत. सचिनच्या पाठोपाठ रिकी पाँटिंग (१३,३७८), जॅक कॅलिस (१३२८९) आणि राहुल द्रविड (१३२८८) हे फलंदाज आहेत.