लंडन -इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रूट विंडीजविरूद्धच्या पहिल्या कसोटीला गैरहजर राहू शकतो. रूटची पत्नी कॅरी जुलैच्या सुरूवातीला दुसर्या मुलाला जन्म देणार आहे. साऊथॅम्प्टनमध्ये 8 जुलैला इंग्लंड आणि विंडीज यांच्यात पहिला कसोटी सामना रंगणार आहे.
रूट म्हणाला, "यावर चर्चा सुरू आहे. वैद्यकीय पथकाशी चर्चा केली गेली आहे. शेवटी काय होईल याबद्दल काहीही निश्चित नाही. हे सर्व सरकारच्या सल्ल्यानुसार आहे. आम्ही या प्रोटोकॉलचे अनुसरण करू."
29 वर्षीय रूट 2017 पासून एकाही कसोटी सामन्याला मुकला नव्हता. रूटच्या अनुपस्थितीत बेन स्टोक्स संघाचा कार्यभार स्वीकारेल असेही रूटने स्पष्ट केले. तो म्हणाला, "बेन उत्तम कर्णधार ठरेल. उपकर्णधार म्हणून नवीन उदाहरणे दिली आहेत."
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे क्रिकेट विश्व ठप्प झाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक स्पर्धा, मालिका रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण आता आयसीसी पुन्हा क्रिकेट सुरू करण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू केले आहेत. यानुसार इंग्लंड क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.