वेलिंग्टन - न्यूझीलंड देश कोरोना व्हायरसमुक्त झाल्याबद्दल क्रिकेटपटू जिमी नीशमने देशवासियांचे अभिनंदन केले आहे. न्यूझीलंडमधील शेवटचा कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे देशात आता एकही न्यूझीलंडचा अॅक्टिव्ह रूग्ण नाही.
नीशम ट्विटरवर म्हणाला, "कोरोनाव्हायरमुक्त न्यूझीलंड! सर्वांचे अभिनंदन. नियोजन, चांगले दृढनिश्चय आणि कार्यसंघ या महान किवी वैशिष्ट्यांमुळे सर्व सुरळित." न्यूझीलंडमध्ये गेल्या 17 दिवसांपासून कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही.
देश लेव्हल-१ च्या सतर्कतेपेक्षा पुढे जाईल, असे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डेन यांनी जाहीर केले आहे. न्यूझीलंडमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून कोणत्याही निर्बंधाशिवाय विवाहसोहळे सार्वजनिक वाहतूक सुरू होईल.
फेब्रुवारी महिन्यापासून न्यूझीलंडमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. देशात सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण नाही, असा आजचा पहिला दिवस असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. परदेशातून एकही कोरोनाबाधित व्यक्ती देशात येणार नाही, याची काळजी न्यूझीलंड मध्ये घेतली जात आहे. त्यासाठी देशाच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. मात्र, न्यूझीलंडच्या नागरिकांसाठी नियमांमध्ये सूट देण्यात आलीय.
कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. जगभरामध्ये आतापर्यंत 70 लाख 80 हजार 811 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 4 लाख 5 हजार 74 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 34 लाख 55 हजार 104 जण कोरोनामुक्त झाले आहेत.