दुबई -स्टिव्ह स्मिथच्या इंग्लंड दौऱ्यामुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी गोलंदाज जयदेव उनाडकटला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार केले जाणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या सूत्रांनी ही माहिती दिली. आयपीएलचा तेरावा हंगाम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत यूएईत होणार आहे.
अधिकृत घोषणा झाली नसली तरी स्मिथ, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स आणि जोस बटलर हे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत सहभागी होणार आहेत. कोरोना प्रोटोकॉलमुळे ऑस्ट्रेलियाचे १२ खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे स्मिथच्या अनुपस्थिततीत उनाडकटच्या खांद्यावर राजस्थानच्या संघाची जबाबदारी सोपवली जाणार आहे.
उनाडकटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सौराष्ट्रने मार्चमध्ये झालेल्या रणजी स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. सौराष्ट्रने बंगालला पराभूत करत जेतेपदाचे स्वप्न साकारले होते. मागील ८ वर्षांच्या कालावधीत सौराष्ट्राने तब्बल ४ वेळा रणजीची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, यात त्यांना अपयश आले.
ऑस्ट्रेलियाच्या १२ खेळाडूंमध्ये अॅरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ या दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये स्टीव्ह स्मिथ आणि अँड्र्यू टाय राजस्थान रॉयल्सकडून, मिशेल मार्श, वॉर्नर, जोश फिलिप, केन रिचर्डसन हे खेळाडू सनरायझर्स हैदराबादकडून, पॅट कमिन्स कोलकाता नाइट रायडर्सकडून, ग्लेन मॅक्सवेल किंग्ज इलेव्हन पंजाबकडून, मार्क, स्टॉइनिस, दिल्ली कॅपिटल्सकडून, जोश हेजलवूड चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतात.