नवी दिल्ली -आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसर्या स्थानावर घसरला आहे. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने त्याला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले आहे.
हेही वाचा -नेपाळचे वर्ल्ड रेकॉर्ड, विरोधी संघाला ३५ धावांत गुंडाळले
न्यूझीलंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला सपाटून मार खावा लागला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताच्या गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यांच्या अपयशाचा फटका खेळाडूंना आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत बसला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तीन सामने खेळून बुमराहला एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे गोलंदाजांच्या क्रमवारीत त्याच्या खात्यातील ३५ गुण कमी झाले.
बुमराहपेक्षा बोल्टला आठ गुणांच्या आघाडीसह ताज्या क्रमवारीत ७२७ गुण मिळाले आहेत. अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमान आणि दक्षिण आफ्रिकेच्या कॅगिसो रबाडाने क्रमवारीत अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक कायम राखला आहे. रबाडाच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलिया पॅट कमिन्स, इंग्लंडचा ख्रिस वॉक्स आणि पाकिस्तानचा मोहम्मद अमीर आहे.
फलंदाजांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अव्वल दोन स्थानावरील मक्तेदारी कायम राखली आहे. भारतीय गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या रॉस टेलरनो एका स्थानाची झेप घेत चौथा क्रमांक पटकावला आहे. तर, अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाने तीन स्थानांच्या सुधारणेसह सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.