मुंबई -ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस लिन आयपीएलच्या आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने त्याला २ कोटींच्या बोलीवर आपल्या संघात सामील करुन घेतले. त्यानंतर लिनने ट्विटरवर या निवडीसाठी आनंद व्यक्त करताना बुमराहबद्दल खास मत व्यक्त केले होते. आता बुमराहनेच त्याला ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा -३७ चेंडूत शतक ठोकणाऱ्या युसूफला IPLमध्ये कुणीही वाली नाही... इरफाननं केलं भावूक ट्विट
गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणारा लिन आता आगामी २०२० च्या १३ व्या हंगामात मुंबईकडून खेळताना दिसेल. या बोलीनंतर लिनने ट्विटर करत नवीन हंगामासाठी आपण सज्ज असल्याचं म्हटलं आहे. शिवाय, लिनने आपल्या ट्विटमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह विरुद्ध खेळावे लागणार नाही, असे गमतीनं म्हटले होते. आता त्याच्या या ट्विटवर बुमराहने उत्तर दिले आहे. 'तुझे संघात स्वागत आहे. मात्र, सरावादरम्यान तुला माझा सामना करावाच लागेल', अशी बुमराहने लिनला तंबी दिली आहे.
कोलकातामध्ये झालेल्या या लिलावासाठी ९७१ खेळाडूंनी नोंदणी केली होती. यातील ३३२ खेळाडूंना बीसीसीआयने निवडले होते. मात्र, गुरुवारी या यादीत आणखी सहा खेळाडूंची नावे समाविष्ट करण्यात आली. यामुळे ३३२ ऐवजी ३३८ खेळाडूंवर बोली लागली.