मुंबई- कोरोनामुळे जगभरातील क्रीडा जवळपास ठप्प आहेत. बीसीसीआयनेही आपल्या सर्व स्पर्धा तुर्तास रद्द किंवा काही स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. यामुळे खेळाडू सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहेत. या खेळाडूंकडून त्यांचे कुटुंबीय घरकामं करुन घेताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी शिखर धवनचा घरकाम करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. आता भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराहचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तो घरातील लादी पुसताना दिसत आहे.
बुमराहने आपल्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. घर स्वच्छ ठेवण्यासाठी मी मदत करतोय, यामुळे माझी आई खुश आहे. चप्पल घालून लादी पुसल्यामुळे मला हे काम परत करावं लागलं आहे, असे कॅप्शन लिहीत बुमराहने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
दरम्यान, बुमराहच्या आधी भारताचा डावखुरा सलामीवर शिखर धवन घरात कपडे तसेच कमोड साफ करताना दिसून आला होता. याशिवाय भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराही आपल्या घरात घरकाम करताना पाहायला मिळाला.
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. भारतालाही याचा फटका बसला असून देशात कोरोना रुग्णांची संख्या १२५१ झाली आहे. तर ३२ जणांचा यात मृत्यू झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या परीने उपाययोजना करत आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे.
हेही वाचा -क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी...यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द!
हेही वाचा -कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी महिला क्रिकेटपटू सरसावल्या, मितालीसह यांनी दिली मदत