साऊथम्प्टन -विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरच्या सहा बळींच्या जोरावर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 204 धावांत आटोपला आहे. दुसऱ्या दिवशी पाच बाद 106 धावांवरून खेळण्यास इंग्लंडने सुरुवात केली. कर्णधार स्टोक्स आणि बटलर यांनी सहाव्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी रचली. या दोघानंतर इंग्लंडचा संघ ढेपाळला. स्टोक्सने 7 चौकारांसह 43 तर बटलरने 6 चौकारांसह 35 धावा केल्या. विंडीजकडून होल्डने 42 धावांत 6 तर शेनन गॅब्रियलने 62 धावांत 4 बळी घेतले.
त्यानंतर, वेस्ट इंडिज संघाने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विंडीजच्या संघाने 19.3 षटकात एक बाद 57 धावा केल्या होत्या. क्रेग ब्रेथवेट 20 तर शाय होप 3 धावांवर खेळत आहे. सलामीवीर जॉन कॅम्पबेलला जेम्स अँडरसनने माघारी धाडले.
तत्पूर्वी, पावसामुळे उभय संघातील पहिले सत्र वाया गेले होते. कोरोनानंतरच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय आणि ऐतिहासिक सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडची सुरूवात खराब झाली. सलामीवीर सिब्ले शून्यावर माघारी परतला. तर बर्न्सने 30 धावांचे योगदान दिले.