जळगाव - प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये महत्त्वाची समजली जाणारी रणजी क्रिकेट स्पर्धा सध्या सुरू आहे. या स्पर्धेत जळगावच्या शशांक विनायक अत्तरदे या अष्टपैलू खेळाडूने चमकदार कामगिरी करत क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले आहे. मुंबई संघाकडून खेळणाऱ्या शशांकने कर्नाटक विरुद्धच्या सामन्यात दोन्ही डावांत ९ बळी टिपले. या सामन्यात कर्नाटकने मुंबईचा ५ गडी राखून पराभव केला. मात्र, शशांकची कामगिरी कर्नाटकच्या विजयापेक्षा 'भाव खाऊन' गेली.
शशांक अत्तरदे याचे कुटुंब मूळचे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील साळवा गावचे. मात्र, नोकरीनिमित्ताने त्याचे आजोबा जळगावात स्थायिक झाले होते. तेव्हापासून अत्तरदे कुटुंबीयांचे ऋणानुबंध जळगावशी जुळले. त्याचे वडील विनायक अत्तरदे हे एका खासगी कंपनीत लेखा विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत होते. दीड वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. तर आई नंदिनी या शहरातील नंदिनीबाई बेंडाळे मुलींच्या महाविद्यालयात वाणिज्य विभागात प्राध्यापक म्हणून सेवारत आहेत. शशांकला एक विवाहित मोठा भाऊ असून तो पत्नीसह पुण्याचे स्थायिक आहे. आता जळगावात त्याची आई आणि आजी दोघी राहतात.
शशांकच्या कुटुंबात खेळाला महत्त्व आहे. त्याची आई लहानपणी उत्तम कबड्डीपटू होत्या. तर काका देखील क्रिकेट, खो-खो यासारख्या खेळांमध्ये पारंगत होते. आई आणि काकांनीच शशांकला लहानपणापासून क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन दिले. त्यातूनच शशांकवर क्रिकेटचे संस्कार घडले. आजवरच्या क्रिकेट प्रवासात त्याने जे काही यश मिळवले आहे, त्यात कुटुंबीयांचाच मोठा वाटा राहिला आहे.
मुंबईत खेळवण्यात आलेल्या रणजी स्पर्धेतील कर्नाटक विरुद्धच्या सामन्यात शशांकने पहिल्या डावात १९ षटकात ५८ धावा देत ५ बळी टिपले. तर दुसऱ्या डावात १० षटकात ५२ धावा देत ४ बळी टिपले. दोन्ही डाव मिळून त्याने कर्नाटक संघाचे ९ बळी टिपले.
शशांकने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करावं -
शशांकचा आजवरचा क्रिकेट प्रवास उल्लेखनीय राहिला आहे. क्रिकेटप्रती त्याची असलेली जिद्द पाहता तो यापुढेही यश मिळवेल, यात शंका नाही. शशांकने भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करावं, हीच आपली अपेक्षा असल्याची भावना त्याची आई नंदिनीने 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.