मुंबई- भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जला, तुला विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळायला आवडेल की महेंद्रसिंह धोनीच्या, असे विचारले असता, तिने धोनीच्या नावाला पसंती दिली. जेमिमाने धोनीच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक केले आणि त्याचा खेळ पाहून लहानाची मोठी झाल्याचे तिने सांगितले.
एका इन्स्टाग्राम व्हिडिओ चॅट दरम्यान जेमिमाला धोनी आणि कोहली यांच्यापैकी तुला कोणाच्या नेतृत्वात खेळायला आवडेल असे विचारले असता ती म्हणाली, 'महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल. त्याचा खेळ पाहून मी लहानाची मोठी झाली आणि धोनीने विश्वकरंडक स्पर्धेत नेतृत्वाचे कौशल्य दाखवून दिले आहे.'
धोनी हा आयसीसीच्या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा जगातला एकमेव कर्णधार आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने एकदिवसीय आणि कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. धोनीने २०० एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले असून यातील ११० सामने भारताने जिंकले आहेत. तर ७४ सामन्यांत भारताचा पराभव झाला आहे.