मुंबई- कोरोना लढ्यात मदतनिधी उभारण्यासाठी, भारत-पाकिस्तान यांच्यात मालिका खेळवण्याचा प्रस्ताव ठेवणाऱ्या माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरला कपिल देवच्या पाठोपाठ आणखी एका भारतीय क्रिकेटपटूने सुनावले. दोन्ही देशांच्या दरम्यान क्रिकेट खेळायचे की नाही याचा निर्णय अख्तर नाही तर सरकारचा असल्याचे सांगत मदन लाल यांनी अख्तरला फटकारले आहे.
शोएब अख्तरने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारत-पाकिस्तान यांच्यात ३ मालिका खेळण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या सामन्यातून निर्माण होणारा निधी कोरोनाच्या लढ्यात वापरता येईल, असे त्याने म्हटले होते. यावर भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांनी भारताला पैशाची गरज नाही, अशा शब्दात शोएबला सुनावले होते.
त्यानंतर माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी देखील शोएबला फटकारले आहे. त्यांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायचे की नाही याबाबतचा निर्णय भारत सरकारचा आहे. जोपर्यंत सरकार सांगत नाही तोपर्यंत बीसीसीआय पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणार नाही, असे सांगितले.