नवी दिल्ली - आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यानंतर, सर्व भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. भारताची युवा सलामीवीर शफाली वर्माला रडू कोसळले होते.
हेही वाचा -रोड सेफ्टी विश्व सिरीज : भारताचा सलग दुसरा विजय, इरफानची 'पठाणी' खेळी
'शफालीला रडताना पाहून खूप वाईट वाटले', अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने दिली आहे. 'मला शफालीसाठी वाईट वाटले. ती उत्तम प्रकारे पुनरागमन करेल. तिची स्पर्धेतील कामगिरी, कौशल्य आणि मानसिक दृढता दर्शवते. भारतासाठी ती निराशाजनक रात्र होती. पण भारतीय संघ पुनरागमन करेल. येथे सर्व काही संपत नाही. ही फक्त एक सुरुवात आहे', असे ब्रेट लीने म्हटले आहे.
या स्पर्धेदरम्यान जाहीर झालेल्या आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत शफालीने अव्वल स्थान काबीज केले होते. मात्र, अवघ्या तीन दिवसात तिला हे स्थान सोडावे लागले. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या टी-२० क्रमवारीत शफाली तिसऱया स्थानावर ढकलली गेली आहे.
जागतिक महिला दिनी रंगलेल्या महिलांच्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारताचा ८५ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातले. स्पर्धेत चांगल्या फॉर्मात असलेली भारताची शफाली वर्मा अंतिम सामन्यात मात्र ढेपाळली.