कोलकाता - टीम इंडियाने बांगलादेश विरुध्दच्या ऐतिहासिक कसोटी सामना १ डाव ४६ धावांनी जिंकला आणि २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने निर्भेळ यश मिळवले. भारताच्या या विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने आपल्या संघासह बीसीसीआयचे नवनियुक्त अध्यक्ष सौरव गांगुलीची स्तुती केली.
पहिल्या दिवस-रात्र सामन्यात विजय मिळवल्यानंतर विराट म्हणाला, 'संघातील सर्वच खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले. यामुळे टीम इंडियाने हा सामना एकतर्फा जिंकला. या विजयाचे श्रेय सौरव गांगुलींनाही दिलं पाहिजे. त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी लढाऊ वृत्तीचा पाया रचला. दादाच्या संघापासून हे सुरू झाले आणि त्यांनी सुरू केलेली ही विजयी परंपरा आम्ही पुढे नेत आहोत.'
गांगुलीच्या लढाऊ वृत्ती घेऊन आज घडीला टीम इंडिया मैदानात उतरले. टीम इंडियाचे गोलंदाज निडर होऊन मैदानात उतरतात. त्यांच्यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे. ते कोणत्याही फलंदाजाविरुध्द गोलंदाजीसाठी नेहमीच तयार राहतात. ही गोष्ट गांगुली यांच्या धोरणाने साध्य झाली, असेही विराट म्हणाला.