चेन्नई -भारत आणि इंग्लंड या दोन तुल्यबळ संघात ५ फेब्रुवारीपासून पहिला कसोटी सामना सुरू होत आहे. चेन्नईच्या एम.ए. चिदम्बरम स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. जलदगती गोलंदाज इशांत शर्मा भारतीय संघात परतला असून या सामन्याद्वारे त्याला एक खास विक्रम खुणावत आहे.
इशांत शर्माने भारतासाठी आत्तापर्यंत ९७ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने ३२.२९च्या सरासरीे २९७ बळी टिपले आहेत. पाहुण्या संघाच्या तीन फलंदाजांना बाद करत इशांतच्या खात्यात ३०० कसोटी बळी जमा होतील. अशी कामगिरी करणारा तो भारताचा तिसरा जलदगती गोलंदाज ठरेल.
हेही वाचा - आयसीसीचा नवा पुरस्कार : रूटसह भारताच्या रिषभ पंतला नामांकन
३२ वर्षीय इंशात शर्माच्या आधी कपिल देव आणि झहीर खान यांनी भारतासाठी ही कामगिरी केली आहे. माजी कर्णधार कपिल देव यांनी १३१ कसोटी सामन्यांत ४३४ बळी घेतले आहेत. तर, अनुभवी झहीर खानच्या खात्यात ९२ सामन्यात ३११ बळी जमा आहेत.
दुखापतीतून सावरल्यानंतर इशांत राष्ट्रीय संघात पुनरागमन करत आहे. इशांत हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौर्यावर एकही सामना खेळू शकला नाही.
भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणारे गोलंदाज -
- अनिल कुंबळे - १३२ सामने, ६१९ बळी.
- कपिल देव - १३१ सामने, ४३४ बळी.
- हरभजन सिंग - १०३ सामने, ४१७ बळी.
- रविचंद्रन अश्विन - ७४ सामने, ३७७ बळी.
- झहीर खान - ९२ सामने, ३११ बळी.
- इंशात शर्मा - ९७ सामने, २९७ बळी.