कोलकाता -'ईशांत, शमी आणि उमेश एकत्र येऊन 'शिकार' करतात. त्यांचे कार्य निश्चित आहे आणि ते केवळ त्यांच्या कामगिरीवरच नव्हे तर एकमेकांच्या कामगिरीचेही कौतुक करतात. म्हणूनच, त्यांच्या यशामागील हे एक रहस्य आहे. ते त्यांच्या मूलभूत गोष्टींवर अधिक काम करतात', असे विराटने म्हटले. बांगलादेशविरूद्धच्या ऐतिहासिक कसोटीत भारताच्या वेगवान गोलंदाजांनी केलेल्या दमदार प्रदर्शनामुळे टीम इंडियाला एक डाव आणि ४६ धावांनी विजय साध्य करता आला.
ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव हेही वाचा -भारताचा बांगलादेशवर 'गुलाबी' विजय; मालिकाही जिंकली
या कसोटीतील दोन्ही डावात भारताच्या फिरकीपटूंना एकही बळी मिळाला नाही. गुलाबी चेंडूच्या वैशिष्ठ्यपूर्ण बांधणीमुळे वेगवान गोलंदाजांना या कसोटीत फायदा उचलता आला. भारतीय वेगवान त्रिकुट ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्या माऱ्यासमोर बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांवर आटोपला. तर, दुसऱ्या डावातही बांगलादेशचा संघ १९५ धावांच करु शकला.
सामनावीर ठरलेल्या ईशांत शर्माने दोन्ही डावांत मिळून ९ गडी बाद केले. दिवस-रात्र कसोटीत ईशांत भारताकडून पहिला गडी, पहिले निर्धाव षटक आणि पहिला चेंडू टाकणारा गोलंदाज ठरला आहे. ईशांतसोबतच उमेश यादवनेही या कसोटीत शानदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात एकूण ८ गडी बाद केले. पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात ५ गडी बाद करत त्याने या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. तर शमीनेही पहिल्या डावात २ बळी घेतले आहेत.