नवी दिल्ली -भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने कृणाल पांड्या आणि दीपक हुड्डा यांच्यातील वादाबाबत बडोदा क्रिकेट असोसिएशनकडे (बीसीए) चौकशीची मागणी केली आहे. १० जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेला प्रारंभ झाला. मात्र, स्पर्धेच्या एका दिवसापूर्वी, दीपक हुड्डाने कृणालवर गंभीर आरोप करत स्पर्धेतून माघार घेतली. कृणाल शिवीगाळ करत असल्यामुळे या स्पर्धेत खेळणार नसल्याने दीपकने बीसीएला पत्राद्वारे कळवले होते.
त्याच्या निर्णयानंतर बीसीएच्या सीईओने दीपकला गैरवर्तन आणि जबाबदारीपासून दूर पळण्याबाबत विधान केले. या सर्व घटनेबाबत आता इरफान पठाणने ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ''कोरोनाच्या या कठीण काळात खेळाडूचे मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून बायो-बबलमध्ये असताना त्यांनी खेळावर लक्ष केंद्रित करावे. अशा घटनांचा खेळाडूवर विपरित परिणाम होऊ शकतो आणि या घटना टाळणे आवश्यक आहे.''
यासोबतच इरफानने चांगली कामगिरी केलेल्या ३० वर्षांखालील दोन खेळाडूंना बडोदा संघात स्थान न दिल्याबद्दलही निराशा व्यक्त केली आहे. ३६ वर्षीय इरफान म्हणाला, ''गेल्या हंगामात सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत बडोद्यासाठी आदित्य वाघमोडेने सर्वाधिक धावा (३६४) केल्या आणि स्वप्निल सिंगने अष्टपैलू कामगिरी (१० बळी आणि २१६ धावा) केली परंतु निवडकर्त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.''