मुंबई- कोरोना विरोधातील लढ्यासाठी माजी क्रिकेटपटू 'पठाण' बंधूंनी ४००० मास्क, मदत म्हणून केली होती. त्यानंतर आता दोघांनी पुन्हा मदत दिली आहे. त्यांनी १० हजार किलो तांदूळ आणि ७०० किलो बटाटे गरजूंना दान केले आहेत. दरम्यान, कोरोना लढ्यात मदतीसाठी अनेक खेळाडू स्वतःहून पुढे येत आहेत. अनेकांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत आर्थिक मदत केली आहे.
भारतीय संघाचे माजी खेळाडू इरफान आणि युसूफ पठाण यांनी सध्याच्या खडतर काळात, आपले सामाजिक भान राखत गरजू व्यक्तींच्या अन्नधान्याची सोय केली आहे. त्यांनी १० हजार किलो तांदूळ आणि ७०० किलो बटाटे दिले आहेत. त्यांच्या या मदतीचे वाटप बडोद्यातील गरजू व्यक्तींना केले जाणार आहे.
दरम्यान, पठाण बंधु व्यतिरिक्त अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) पंतप्रधान मदत निधीसाठी २५ लाख रुपयाचे दान दिले आहे. कोलकाता येथील फुटबॉल क्लब मोहन बागाननेही २० लाख रुपये दिले आहेत. याशिवाय सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, अजिंक्य रहाणे, बजरंग पुनिया, पी. व्ही. सिंधू, मेरी कोम, मिताली राज, रोहित शर्मा, विराट कोहली, पूनम यादव, दीप्ती शर्मा, केदार जाधव, हरभजन सिंग, युवराज सिंह, हिमा दास, आदींनी मदत दिली आहे.