साऊथम्प्टन -आयर्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जोश लिटल याला इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसर्या सामन्यात आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या खात्यात एक डिमेरिट गुणही जोडला गेला आहे.
आयसीसीच्या आचारसंहिता कलम 2.5 चे उल्लंघन केल्याचा आरोप लिटलवरआहे. आयर्लंड आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात असून इंग्लंड या मालिकेत 2-0 ने पुढे आहे.
इंग्लंडच्या डावाच्या 16 व्या षटकात जॉनी बेअरस्टोला बाद केल्यानंतर लिटलने चुकीची भाषा वापरली होती. लिटलने आपली चूक मान्य केली असून मॅच रेफरीने त्याला शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे औपचारिक सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही.
साऊथम्प्टनच्या एजेस बाऊल मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने आयर्लंडचा चार गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या आयर्लंडने 9 बाद 212 धावा केल्या. तर, प्रत्युत्तरादाखल यजमान संघाने 32.3 षटकांत 6 गडी गमावत 216 धावा करत सामना जिंकला. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने 41 चेंडूत 2 षटकार आणि 14 चौकारांसह शानदार 82 धावा फटकावल्या. बेअरस्टोला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.