मुंबई- रोहित शर्माच्या नेतृत्वात आयपीएल खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघात चांगल्या फलंदाजांची फौज आहे. स्वत: रोहित तुफानी फलंदाजी करतो. याशिवाय केरॉन पोलॉर्ड, अंबाती रायडू, हार्दिक पांड्या सारख्या अष्टपैलू खेळाडूंची संघात भरमार आहे. या खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने तब्बल चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. आज आपण मुंबई इंडियन्ससाठी कोणत्या फलंदाजाने सर्वात जास्त षटकार लगावले आहेत, ते पाहू...
आतापर्यंत आयपीएलचे १२ हंगाम पार पडले आहेत. यात षटकाराचा विषय आला की रोहित शर्माने सर्वात जास्त षटकार लगावले असतील, असा सर्वांचा अंदाज असेल. पण हा अंदाज चुकीचा आहे. मुंबई इंडियन्ससाठी रोहित नव्हे केरॉन पोलार्डने सर्वात जास्त षटकार लगावले आहेत.
पोलार्डने आजघडीपर्यंत एकूण १७६ षटकार लगावले आहेत. पोलार्ड नंतर रोहित शर्माचा नंबर लागतो. त्याने १४३ षटकार खेचले आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमाकांवर अंबाती रायुडू आहे असून त्याच्या खात्यात ७९ षटकारांची नोंद आहे. हार्दिक पांड्या ६८ आणि फिल सिमन्स ४४ षटकारांसह अनुक्रमे चौथ्या, पाचव्या क्रमांकावर आहेत.