ठाणे -आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नईमधील अंतिम सामना पाहण्यासाठी चक्क एका विवाह सोहळ्यात नवरा–नवरीच्या व्यासपीठाच्या बाजूलाच भव्य स्क्रीन उभारून रौनक आणली होती. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारल्याने वऱ्हाडी मंडळींने एकच जल्लोष साजरा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या लग्न सोहळ्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये चांगलीच रंगली आहे.
क्रेझ आयपीएलची.. पाहुणे, नातेवाईक लग्नाला दांडी मारतील म्हणून यजमानांनी मंडपातच लावली भव्य स्क्रीन - Indian Premier League
अंतिम चेंडूवर दोन धावा काढण्यास चेन्नईचा संघ अपयशी ठरला आणि १ धावेने मुंबईने थरारक विजय मिळवत चौथ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरले.
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी जिल्ह्यातील मोठमोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे हाऊसफुल्ल झाल्याचे सर्वत्र दिसून आले. या सामन्याच्या निमित्ताने ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी हॉटेल्समालकांनी मोठ्या स्क्रीन उभारून विविध सवलतीही जाहीर केल्या होत्या. तसेच काही ठिकाणी सोसायटीत भव्य पडदा उभारून सामन्याचा आनंद क्रिकेटप्रेमी घेत असतानाच लग्न सोहळ्यात पाहुणे मंडळी सामना पाहण्यासाठी दांडी मारतील या उद्देशाने यजमानांनी नवरा-नवरीच्या व्यासपीठाच्या बाजूला भव्य पडदा उभारून वऱ्हाडी मंडळींना सामना पाहण्यासाठी सोय केली होती.
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली. चेन्नई सुपर किंग्जचे गोलंदाज दीपक चाहर, शार्दुल ठाकूर व इम्रान ताहिर यांनी अचूक व शिस्तबद्ध मारा करत मुंबई इंडियन्सला विजेतेपदाच्या सामन्यात ८ बाद १४९ धावांपर्यंत रोखले. तर मुंबई इंडियन्सने उभारलेले आव्हान स्वीकारताना चेन्नई सुपर किंग्जकडून सलामीवीर शेन वॉटसनने अर्धशतक झळकावत विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या. मात्र, शेन वॉटसन बाद होताच सामन्याचा निकाल मुंबई इंडियन्सच्या बाजूने फिरला. अंतिम चेंडूवर दोन धावा काढण्यास चेन्नईचा संघ अपयशी ठरला आणि १ धावेने मुंबईने थरारक विजय मिळवत चौथ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरले.