नवी दिल्ली -यंदाची आयपीएल स्पर्धा युएईत होण्याची चर्चा सुरू असताना फ्रेंचायझींनीही आपली तयारी सुरू केली आहे. भारतातील वाढत्या कोरोनाच्या घटनांमुळे क्रिकेटविश्वातील महत्त्वाची स्पर्धा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) होणार असल्याची चर्चा आहे. अशा स्पर्धांसाठी आम्ही आमच्या सुविधा तयार ठेवत आहोत, असे दुबई शहरातील क्रिकेट आणि स्पर्धेचे प्रमुख सलमान हनीफ म्हणाले होते. बीसीसीआय आयसीसीच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या निर्णयाबाबत वाट पाहत आहे.
आयपीएल फ्रेंचायझीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ''आम्ही अबू धाबीमध्ये हॉटेल्स निवडण्यास सुरवात केली आहे ज्यामध्ये खेळाडू राहतील. त्यासोबतच संघ कसे प्रशिक्षण घेईल, याचीही तयारी सुरू केली आहे. तुम्हाला स्मार्ट व्हायला हवे आणि लवकर तयारी करावी लागेल. आम्हाला आवश्यक माहिती देण्यात आली आहे आणि त्यानुसार आम्ही तयारी करत आहोत. आम्ही अबूधाबीला कोणत्या हॉटेलमध्ये राहू याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला त्या देशाच्या आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांचे नक्कीच पालन करावे लागेल."