मुंबई- कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती सामान्य झाल्यानंतर, क्रिकेटची पुढील वाटचाल कशी असावी, यावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्यांचे रोखठोक मत मांडले आहे. टी-२० विश्वकरंडक स्पर्धा खेळवण्याऐवजी भारतीय खेळाडूंनी आयपीएल आणि दोन देशांमधील मालिका खेळण्यावर अधिक भर द्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, कोरोनामुळे मागील दोन महिन्यात एकही स्पर्धा खेळवण्यात आलेली नाही.
शास्त्री एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले, 'मला वाटतं की पहिल्यांदा दोन देशांमधील मालिकेने क्रिकेटची पुन्हा एकदा सुरुवात व्हावी. जर आम्हाला विश्वकरंडक आणि दोन देशांमधील मालिका यामध्ये पर्याय निवडण्यास सांगितल्यास आम्ही मालिकेचा पर्याय निवडू. कारण सद्य परिस्थिती पाहता १५ संघ प्रवास करुन एका देशात येण्यापेक्षा दोन देशांनी एक किंवा दोन मैदानांमध्ये क्रिकेट मालिका खेळणं कधीही चांगलं आहे.'
ऑस्ट्रेलियामध्ये या वर्षाच्या अखेरीस टी-२० विश्वकरंडकाचे आयोजन आहे. पण, ऑस्ट्रेलिया सरकारने कोरोनामुळे ३० सप्टेंबरपर्यंत आपल्या देशाच्या सीमा बंद केल्या आहेत. यामुळे या स्पर्धेवरही अनिश्चिततेचे सावट आहे. अशा परिस्थितीत शास्त्री यांनी भारतीय खेळाडूंसाठी स्थानिक क्रिकेट, आयपीएल आणि दोन देशांमधील मालिका असा प्राधान्यक्रम निवडण्यास सांगितलं आहे.