चेन्नई - आयपीएल २०२१ मध्ये आज विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ व डेव्हिड वॉर्नरचा सनरायजर्स हैदराबाद संघ एकमेकांना भिडणार आहेत. बंगळुरूने सलामीच्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्सला पराभूत करत स्पर्धेची सुरुवात दमदार केली. ही विजयी लय कायम राखण्यासाठी हा संघ प्रयत्नात आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत झाल्यानंतर हैदराबादला पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलामीच्या सामन्यात कायले जेमिसन, डॅनियल ख्रिस्तीयन, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल यांची गोलंदाज म्हणून निवड केली. हर्षल, जेमिसन, सिराज, ख्रिस्तीयन यांनी या सामन्यात आपली चमक दाखवली. युजवेंद्र चहल याला पॉवर प्लेमध्ये मार खावा लागला, पण त्याच्याकडे अनुभव आहे. त्यामुळे त्याला बाहेर बसवण्यात येईल असे वाटत नाही. पण लेगस्पिनर अॅडम झम्पा याला हैदराबादविरुद्धच्या अंतिम अकरामध्ये संधी देण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. फलंदाजीत बंगळुरूची मदार कर्णधार विराट कोहली, ए बी डिव्हिलीयर्स व ग्लेन मॅक्सवेल या फलंदाजांवर आहे. कोरोनावर मात केलेला देवदत्त पड्डीकल आजचा सामना खेळू शकतो. यामुळे बंगळुरूची सलामीची चिंता मिटली आहे.
सनरायजर्स हैदराबादला सलामीच्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. पण या पराभवाला मागे टाकून डेव्हिड वॉर्नरचा संघ नव्या उमेदीने मैदानात उतरेल यात शंका नाही. भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन व राशीद खान यांना बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात टिच्चून मारा करावा लागणार आहे. तर डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे यांना फलंदाजीची बाजू सांभाळावी लागणार आहे. केन विल्यमसन अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यातही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.