मुंबई - संजू सॅमसनच्या वादळी शतकानंतरही राजस्थान रॉयल्सला पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात ४ धावांनी पराभव पत्कारावा लागला. संजूने ६३ चेंडूमध्ये ११९ धावांची खेळी केली. या खेळीत १२ चौकार आणि ७ उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. पण त्याची ही संघर्षपूर्ण शतकी खेळी राजस्थानला विजय मिळवून देऊ शकली नाही. राजस्थानचा थोडक्यात हुकलेल्या पराभवानंतर संजूने भावनिक प्रतिक्रिया दिली.
सामना संपल्यानंतर संजू म्हणाला, 'माझ्या भावनांचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. राजस्थानला विजय मिळवून देण्याचे माझे ध्येय होते. मला वाटतं की, या खेळीपेक्षा मी अधिक काय करु शकलो असतो.'
शेवटच्या चेंडूवर षटकार मारेल, असे मला वाटलं. मी मोठ्या ताकदीने तो चेंडू देखील टोलावला. पण तो सीमारेषेबाहेर न जाता उंच उडाला आणि दीपक हुडाने तो पकडला. शेवटी हा सगळा खेळाचा भाग आहे. आम्हाला वाटले की, विकेट चांगली आहे आणि आम्ही लक्ष्य गाठू पण आम्ही जिंकता जिंकता हरलो, असेही संजू सॅमसन म्हणाला.